Vision & Mission

Vision

Mission


सुसज्ज इमारतीची नवनिर्मिती
शाळा देत आहे या सुविधा :
• विद्यार्थ्यांना भावनिक आणि मानसिक सुरक्षा.
• सर्व प्रकारच्या पुस्तकांचे परिपूर्ण वाचनालय.
• विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घालणारी प्रयोगशाळा.
• स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणेसाठी समृद्ध पुस्तक कट्टा.
• तंत्रज्ञानातून नवनिर्मिती व कौशल्यविकास साधण्यासाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा.
• कला व क्रीडा कौशल्य विकासासाठी साहित्यांनी परिपूर्ण दालन.
• व्यक्तिमहत्व विकास, आरोग्य तपासणी, IQ TEST , व्यवसाय कौशल्य, व्यवसाय मार्गदर्शन यासाठी उपयुक्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
• गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी MENTORS .


Our Institution's Story

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक या संस्थेची स्थापना 18 ऑगस्ट 1980 या दिवशी झाली.संस्थेचा स्थापना दिवस जरी 18 ऑगस्ट 1980 असला तरी त्यापूर्वी संस्था उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. नाशिक शहराच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक संस्था कार्यरत होत्या.सातपूर, अंबड या भागात औद्योगिक वसाहती झपाट्याने विकसित होत असताना कामगारांचा मोठा वर्ग सिडको, सातपूर या विभागात वास्तव्याला येत होता. या भागात कामगारांच्या वसाहती विस्तारत होत्या. या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी या हेतूने शिक्षण संस्था उभारावी असे वाटू लागले. हे काम सोपे नाही याची जाणीव होती. संस्था स्थापण्यापूर्वी दोन वर्ष या कामासाठी चांगले सहकारी शोधणे, जागेचा शोध घेणे , मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था करणे यासारख्या कामांना दोन वर्षे खर्ची पडली. 18 ऑगस्ट 1980 रोजी संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी झाली.
मॉडर्न म्हणजेच आधुनिक अशी शिक्षण संस्था नाशिक शहरात नावारूपास येत आहे. विद्यार्थ्यांना नव्याने येऊ घातलेल्या बदलांना तोंड देता यावे म्हणून शिक्षणाच्या मदतीने समर्थ बनवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. शिक्षणामुळे ज्याप्रमाणे भौतिक प्रगतीला चालना मिळते त्याचप्रमाणे जीवनातील अंतिम सत्याच्या दिशेने जाणाऱ्या शोधाच्या मार्गक्रमणाला सुरुवात होऊ शकते.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नव्याने कात टाकून अधिक जोमाने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होत आहे. संस्थेने गेल्या तीन चार वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे . विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्या म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक हजेरी, स्मार्ट टीव्ही यासारख्या भौतिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. डिजिटल क्लासरूम ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे . विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुंदावलेल्या ज्ञानाच्या कक्षा सहज ओलांडता याव्यात त्यासाठी सक्षम बनवण्याची तयारी सुरू आहे.
अतिशय महागड्या शाळांमधून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा सर्वसामान्य तळागाळातील विद्यार्थ्यांना मिळवून देताना खरेच दमछाक होत आहे. असे असले तरी गरिबातल्या गरीब मुलांना मध्यमवर्गीय ,उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंत घरातील मुलांच्या बरोबर बसून शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कटिबद्ध झाली आहे.
हा सर्व बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा फार मोठा व महत्त्वाकांक्षी कार्यक्रम संस्थेने हाती घेतला आहे. 21 व्या शतकातील शिक्षक हा विसाव्या शतकातील शिक्षकांपेक्षा निश्चितच वेगळा आहे . ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दिले जाणारे सर्व समावेशक (Holistic) शिक्षण पद्धती अवलंबवण्यासाठी आमचे शिक्षक सक्षम आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षण तज्ञांची व्याख्याने आयोजित करून उद्बोधन वर्ग सुरू केले आहेत. शिकवत असताना आपणही शिकावे यासाठी शिक्षकांना प्रेरित केली जात आहे. शिक्षकांनी अविरत विद्यार्थी असावे यासाठी वाचनालय अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानी ,तपस्वी, गुरूंची परंपरा निर्माण व्हावी म्हणून संस्थेतील शिक्षकांना जगात नावारूपाला आलेल्या जे कृष्णमूर्तींच्या विचारावर आधारित शिक्षण देत असलेल्या शाळांतून प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे .त्यानुसार संस्थेने कामकाजाला सुरुवात केल्या आहे. 5+3+3+4 यानुसार नवीन रचना अमलात येत आहे. बालवाडी ते दुसरी ही पाच वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षे आहेत. या शिक्षणाचा पाया (फाउंडेशन) भक्कम करण्यासाठी संस्थेने अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित गटांना अधिक सक्षम बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येत आहे .नव्याने येऊ घातलेल्या या बदलांसाठी आमचे शिक्षक सक्षम होत आहेत. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्था एकत्र येऊन दर्जेदार व आदर्श शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल याची निश्चित खात्री आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान जसे आवश्यक आहे तसेच निसर्ग, माणूस व चराचरातील पशु प्राण्यांना आपले म्हणणारा आदर्श विद्यार्थी आम्ही निश्चितच घडवू अशी खात्री आहे.

“ जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा”
या ओळीतील तत्त्वज्ञान प्रत्यक्षात जगण्यासाठी, समर्थ असा विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कटिबद्ध होत आहे.

रंगनाथ बाबुराव शिरसाठ
संस्थापक सेक्रेटरी तथा विद्यमान कार्याध्यक्ष
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, नाशिक

what people say

What people think about us.